ज्ञानप्रकाशाचा मार्ग दाखविणारा थोर क्रांतिसूर्य, महान सत्यशोधक

अंधश्रद्धा, जुनाट चाली, अनिष्ट रूढी-परंपरांच्या जोखडाखाली अडकलेल्या समाजाला शिक्षणाचा महामंत्र देणाऱ्या, स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महात्मा जोतिराव फुले यांच्या अर्धांगिनी म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. समस्त महिला वर्गाच्या उद्धारासाठी त्यांनी घेतलेले कष्ट खूपच मोलाचे आहेत. सावित्रीबाई फुले यांची जयंती ३ जानेवारीला साजरी केली जाते. हेच निमित्त साधून शुक्रवारी ‘सत्यशोधक’ हा बहुचर्चित चित्रपट महाराष्ट्रभरात प्रदर्शित करण्यात आला. या आगळ्या वेगळ्या चित्रपटाने सगळ्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘सत्यशोधक’ चित्रपटाचे निर्माते सुनील शेळके हे बुलढाणा जिल्ह्यातील माजी उपजिल्हाधिकारी आहेत. त्यांनी निर्माण केलेल्या या चित्रपटाचा बुलढाणावासीयांना मोठा अभिमानच आहे. त्यामुळे पहिल्या दिवशीचा पहिला शो महिलांसाठी बुक झाला होता. बुलढाण्यात हा चित्रपट पाहण्यासाठी महिलांचा एवढा उत्साह दिसून आला की, सर्वच महिलांनी चक्क सावित्रीबाईंची वेशभूषा साकारून चित्रपटाचा आनंद घेतला. निर्माते सुनील शेळके यांच्या पत्नी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस जयश्रीताई शेळके यांनीही सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारून महिलांचा उत्साह द्विगुणित केला. ‘सत्यशोधक’ चित्रपट महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित आहे. यामध्ये त्यांच्या जीवनात जे संघर्ष त्यांनी केले आहेत ते संघर्ष आजच्या पिढीला कळावेत, यासाठी खास हा चित्रपट तयार करण्यात आला. लहान मुलीही चित्रपट पाहून सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेत होत्या. एक अभूतपूर्व सुंदर सिनेमा बघितल्याचा आनंद महिलांच्या डोळ्यात दिसत होता. * संदीप कुलकर्णी आणि राजश्री देशपांडे यांच्या अनोख्या लूकची चर्चा ! कसदार अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी महात्मा फुलेंची भूमिका आत्मसात केल्याने ते प्रत्यक्ष जगत असल्याचा भास होत होता. महात्मा फुलेंना साथ देणारी त्यांची अर्धांगिनी म्हणजे सावित्रीबाईंच्या भूमिकेत राजश्री देशपांडे यांनीही उत्कृष्ट अभिनय केला. फुले दाम्पत्याच्या आयुष्यातले विविध पैलू सिनेमातून उलगडले आहेत. सिनेमात तत्कालीन परिस्थितीचे चित्रण अतिशय हुबेहूब केले आहे. व्यक्तिमत्त्वाच्या अंतरंगाचा ठाव घेणाऱ्या या सिनेमाला दोन दिवसात हजारो प्रेक्षकांनी पसंत केले. अस्खलित मराठी भाषेचा वापर, तत्कालीन ग्रामीण सेटअप, कलाकारांचा डोळ्यांनी आणि हावभावांनी केलेला सुंदर अभिनय प्रेक्षकांना इतिहासात नेत होता.

Leave A Comment