Disha

आदरणीय महोदया/महोदय…

महिला बचत गटांची चळवळ गेल्या दशकभरापासून महाराष्ट्रात जोमाने सुरु आहे. गावोगावी नवीन बचत गट सुरु होत आहेत. त्याद्वारे आर्थिक स्वयंपुर्ततेच्या दिशेने होणारी महिलांची वाटचाल ही अत्यंत स्फुर्तीदायक बाब आहे. महिला बचत गटांच्या रुपाने महाराष्ट्रात एका नव्या इतिहासाची मुहुर्तमेढ रोवली गेली आहे. हा इतिहास आहे महिलांच्या स्वयंपूर्णतेचा. महिलांच्या एकजुटीचा आणि एकजुटीतून निर्माण होत असलेल्या महिलांच्या शक्तिचा, स्वयंसहाय्यता महिला बचतगट ही संकल्पना तारण व कारणाशिवाय स्वतःच्या आर्थिक गरजा स्वतःच भागविण्यासाठीची स्वयंभू यंत्रणा आहे. महिला बचतगट ही संकल्पना खरे तर सहकार चळवळीचे दुसरे नवे पर्व असून जनसामान्यांना सहकार चळवळीत सामावणारी संकल्पना आहे.

वास्तविक बचत करणे हा महिलांचा स्थायीभावच आहे. रुपयातले दोन पैसे कसे वाचवावेत हे महिलांकडून शिकावे, असे म्हटले जाते व ते शंभर टक्के खरे आहे. कोणत्याही वस्तूच्या खरेदीबाबत महिला जास्तीत जास्त चिकित्सकपणे विचार करुन मगच निर्णय घेतात. हे अत्यंत योग्य आहे. घरात पैसा असणे हे वेगळे व उपलब्ध पैशांतून बचत करणे हे वेगळे. “बचतीद्वारे महिलांचे सबलीकरण” हा शब्दप्रयोग नेहमी ऐकण्यात येतो. सबल होणे म्हणजे शक्तिमान होणे. महिला सबलीकरण ही अशी प्रक्रिया आहे की, ज्याद्वारे महिला सामूहिकपणे व सर्वांगीण उन्न्तीच्या समान विचाराने क्रियाशील राहतात. पूर्वापार चालत आलेल्या रुढी-परंपरांच्या जोखडाखाली दबलेली महिला नेहमीच साधनसंपत्तीपासून वंचित राहलेली आहे.

देशाचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक स्तर उंचावण्याच्या दृष्टीकोनातून साक्षरतेचे महत्व निर्विवाद आहेच. तथापि, आर्थिक बाबींचे नियंत्रण हातात येत नाही तोपर्यंत महिलांना व त्यांच्या कल्याणासाठी होणाऱ्या विविध उपक्रमांना बळ प्राप्त होणार नाही. हे बळ विचारण्यासाठी महिलांना बचत गटाच्या माध्यमातून उद्योग व्यवसायाचा मार्ग स्विकारणे अत्यंत आवश्यक आहे. काळ बदलला असला तरी सर्वसाधारण पुरुषी मानसिकता बदलेली नाही. त्यामुळे पुरुषी मानसिकतेतून महिलांना सोयीनुसार गृहलक्ष्मी म्हटले जात असले, तरी आर्थिकदृष्ट्या महिला समर्थ होत नाहीत, स्वतःच पायावर उभ्या होत नाहीत, तोवर तिच्या पायातील पारतंत्र्याची बेडी गळणार नाही व तिला खरी सामाजिक प्रतिष्ठाही मिळणार नाही. महिला बचत गटांच्या उपक्रमांमुळे महिलांना बचत करण्याची, त्या बचतीचा योग्य वापर करण्याची तसेच आर्थिक नियोजन व हिशोब करण्याची क्षमता प्राप्त होऊ शकते. महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील, तेव्हाच त्या सर्व क्षेत्रांत आत्मविश्वासाने वावरंन कुटुंब, समाज व राष्ट्राला पुढे नेऊ शकतील, हा या मागील व्यापक विचार आहे. मुळात महिला प्रामाणिक, विश्वासू, समजूतदार भावनाप्रधान व प्रसंगी तितक्याच कठोरदेखील असतात.

शक्यतो अडीअडचणींवर तोडगा काढण्याचा, परस्परांना होईल तितकी मदत करण्याचाच महिलांचा स्वभाव असतो. कोणतीही गोष्ट करताना नेमकेपणा, काटकसर, अचूकता, उत्कृष्ट दर्जा व मनापासून पूर्ण क्षमतेने करणे ही महिलांच्या कार्यपध्दतीची वैशिष्ट्ये असतात. चांगुलपणाची एक प्रखर शक्ती त्यांच्यात असते. सर्व बुंनी सम्यकपणे विचार करण्याची क्षमता त्यांच्यात असते. एकमेकांना समजून घेण्याची विलाण क्षमता महिलांमध्ये असते. प्रामुख्याने गरिब माणसाला सहसा कुण कर्ज देत नाही आणि जर दिलंच तर त्याचा व्याजदर इतका जास्त असतो की ते परत करणेच नाही तर त्याचे फक्त व्याज देखील भरणे अशक्यप्रायः होऊन जाते, म्हणून गरिब माणसाला खरा विकास व्हायचा असेल तर त्याला कमी व्याजदरात कर्ज मिळाले पाहिजे व त्यासाठी बाजारात पत पाहिजे. या दोन्ही गोष्टी एकमेकांवर आधारित आहेत. माव् बाजारात पत नाही म्हणून कर्ज मिळत नाही आणि कर्ज मिळत नाही म्हणून पत निर्माण होत नाही. या दुष्टचक्रात गरजू व्यक्ती सापडते. यावर उपाय म्हणजे तारणाचा प्रश्न सुटला पाहिजे म्हणून स्वयंसहाय्यता गटातील सदस्य एकमेकांना तारण राहतात त्यामुळे स्थावर जंगम मालमत्ता शिवाय संयुक्त जबाबदारी गट म्हणून स्वयंसहाय्यता महिला बचत गटास व गटातील प्रत्येक सभासदास तारणाशिवाय कर्ज मिळते. मागील काळात मोठ्या प्रमाणावर स्वयंसहाय्यता महिला बचत गटांची वाढ झाली. मात्र बहुतांशी बचत गटांचे मुख्य लक्ष हे स्वयंसहाय्यता व अखंडपणे सातत्याने होणाऱ्या सामुहिक बचतीतून तयार होणाऱ्या स्वनिधीपेक्षा अनुदानावर केंद्रीत झाल्याने या अनुदान हव्यासापोटी खरी स्वयंसहाय्यता संकल्पना बाजूला पडली. कारण अनुदान मिळाले तरी अनुदान प्राप्त झाले म्हणून व अनुदान नाही मिळाले तर अनुदान नाही मिळाले म्हणून, अनुदानकेंद्रीपणामुळे बचत गटांचे बंद पडण्याचे प्रमाण लक्षणीय ठरले. कारण बचत गटाचेही बंद पडण्याचे प्रमाण मोठे आहे. काही तांत्रिक कारणास्तव बचत गटाचे व्यवहार सुरळीत राहिले नाहीत. तर काही कालावधीनंतर बचत गटाचा सभासदांना विसर पडतो व कोणत्याही कायद्याने कायदेशिर अस्तित्व नसल्यामुळे मोठ्या उत्साहाने व प्रयत्नाने सुरु केलेला गट अस्तित्वशून्य होउन जातो.