भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत गंभीर संकटात होती त्यावेळेस १९९१ हे वर्ष भारतासाठी निर्णायक असे ठरले. डॉ. मनमोहन सिंगांनी अर्थमंत्री झाल्यानंतर पहिल्याच अर्थसंकल्पाच्या भाषणाची सुरुवात “ज्या कल्पनेची वेळ आली आहे ती कल्पना जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही.” या ओळींनी सुरुवात केली हाती. त्यानंतर भारताची अर्थव्यवस्था बिकट असतांना त्यांनी उदारीकरण, जागतिकीकरण आणि खासगीकरण यासारखे जे धोरणात्मक निर्णय घेतले त्याचाच परिणाम आज भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होतांना आपण बघत आहोत. १९९१ हे वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक महत्त्वाचे वळण घेणारे ठरले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली राबवलेल्या आर्थिक सुधारणांमुळे भारताची अर्थव्यवस्था आधुनिक, जागतिक स्तरावर अधिक स्पर्धात्मक झाली.
आणि कोणताही राजकीय आधार नसलेले मनमोहन सिंग पंतप्रधान झाले
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर विदेशी असल्याने पंतप्रधान होऊ शकत नाहीत अशी टीका करण्यात आल्याने काँग्रेस पक्षाने मनमोहन सिंग यांना पंतप्रधान पदावर बसविले. त्यांनी २००४ ते २०१४ या काळात स्वतः ला प्रसिद्धीच्या झोतापासून दूर ठेवत उत्तम राज्यकारभार चालविला. डॉ. मनमोहन सिंग यांचा कार्यकाळ आर्थिक सुधारणांसाठी महत्त्वाचा ठरला, भारताच्या आर्थिक विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान महत्वाचे मानले जाते. त्यांच्यावर अनेक आरोप झाले परंतु त्यांनी कधीच पातळी सोडून द्वेषाचे आणि तिरस्काराचे राजकारण न करता आपली सोज्वळ प्रतिमा जपली. त्यांच्यावर टीका झाल्यानंतर त्यांनी नम्रपणे पत्रकारांशी बोलतांना एव्हढेच म्हणाले होते की, “मला प्रामाणिकपणाने वाटतं की, समकालीन प्रसारमाध्यमे किंवा संसदेतील माझ्या विरोधी पक्षांपेक्षा इतिहासात माझी दखल अधिक दयाळूपणाने घेतली जाईल.” त्यांच्या प्रत्येक निर्णयाने त्यांना खऱ्या अर्थाने ‘सरदार’ ही उपाधी शोभून दिसणारी होती.
कल्याणकारी निर्णयांमुळे नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाले
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा आणून ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून दिला. दारिद्र्य निर्मूलन आणि आर्थिक सुधारणा व्हावी यासाठी ही योजना अत्यंत महत्वाची ठरली. दुसरा माहितीचा अधिकार हा कायदा, हा असा कायदा आहे जो नागरिकांकडून सरकारवर अवलंबविल्या जातो. या कायद्याने सरकार आणि नागरिकांमध्ये पारदर्शकता आणल्या गेली. आणि आधार योजनेमुळे सर्वसामान्य नागरिकांना शासकीय ओळख मिळाली. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सारख्या योजनेने लोकांना त्यांच्या संलग्न बँक खात्यांद्वारे थेट अनुदान हस्तांतरित करण्याची सुविधा देण्यात आली. आज देशातील कोट्यवधी लोक त्याचा लाभ घेत आहेत. शिक्षणाचा अधिकार कायद्याने ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याचा निर्णय घेतला गेला.
आर्थिक क्रांतीचे जनक तसेच आण्विक करारामुळे मजबूत प्रतिमा निर्माण केली
डॉ. मनमोहन सिंग सरकारने अमेरिकेसोबत २००८ साली नागरी अणुकरार केला, ज्यामुळे भारताला आण्विक इंधन व तंत्रज्ञान मिळू लागले. त्यांच्या या निर्णयामुळे भारताची जगभरात मजबूत प्रतिमा तयार झाली. तसेच आशियाई व जागतिक व्यापारावर भर देऊन जागतिक बाजारात भारताची स्थिती मजबूत केली. आशियाई आणि जागतिक व्यापार परस्परावलंबी आहेत. आशियातील प्रगत देश आणि विकसनशील बाजारपेठा जागतिक व्यापाराच्या वाढीस मोठे योगदान देतात. व्यापारासंबंधित धोरणे आणि नवकल्पना भविष्यातील व्यापार वृद्धीसाठी मनमोहन सिंग सरकारने योग्य निर्णय घेत भारताचे उज्वल भविष्य सुरक्षित केले.
असे बहुआयामी सुसंस्कृत नेतृत्व आणि अजातशत्रू भारतीय राजकारणी असलेले डॉ. मनमोहन सिंग यांच्या जाण्याने भारताने एका सच्चा देशभक्त गमावला आहे.