महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात सुरु असलेला गोळीबार, हत्या, हिट अँड रन, अत्याचार हे मात्र काही थांबायला तयार नाही. दिवसेंदिवस महाराष्ट्र कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत कितीतरी मागे पडला असल्याचे चित्र आहे. सत्ता आणि सत्तेसाठी काहीही अशा दृष्टिकोनातून राज्यकर्त्यांनी महाराष्ट्र चालवला आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
राजकीय व्यक्तींच्याच हत्या, सर्वसामान्यांचं काय ?
पुण्यातल्या कोथरूडमधील सुतारदरा भागात या वर्षाची सुरुवात गँगवॉरनं झाली होती. ५ जानेवारी २०२४ रोजी पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर ३ ते ४ जणांनी गोळीबार करून हत्या केली होती. त्यांनतर वेगवेगळ्या गुन्ह्यांचा हा आलेख असाच वाढत गेला.
मॉरिसभाई नावाच्या व्यक्तीने शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची ८ फेब्रुवारी रोजी फेसबुक लाइव्हवरच गोळीबार करून हत्या केली. घोसाळकरांवर ५ गोळ्या झाडल्या गेल्या आणि त्यातच घोसाळकर यांचा मृत्यू झाला.
फेब्रुवारीतच कल्याण पूर्व मधील भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी रोजी पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार केला. या गोळीबारात शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे माजी नगरसेवक आणि कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड, व त्यांचे सहकारी राहुल पाटील हे जखमी झाले होते.
पुण्यातील एक माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार आणि कोयत्याचे वार करत हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वनराज आंदेकर यांना आपले प्राण गमवावे लागले.
मुंबईतील काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दिकींची हत्येने तर महाराष्ट्र सरकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले. वारंवार घडणाऱ्या या घटनांनी महाराष्ट्र हादरून गेला आहे.
आणि आताचे, मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने कायदा आणि केवळ सर्वसामान्य लोकांसाठीच आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला. अत्यंत निर्घृणपणे हत्या झालेल्या या घटनांनी महाराष्ट्र सुन्न झाला आहे. याची दखल सरकारने घायला हवी.
श्रीमंतांनी कायदा भरडला तर कायद्याने गरिबांना भरडून काढलं
पुण्याच्या कल्याणीनगर भागात १९ मे च्या पहाटे अतिशय वेगाने जाणाऱ्या पोर्शे कारने दुचाकीवर जात असलेल्या युवक आणि युवतीला धडक दिली. त्या दोघांचाही या अपघातात जागीच मृत्यू झाला. या अपघाताने अनेक प्रश्न उपस्थित केले.
मुंबईतील वरळीमध्ये अॅट्रीया मॉलसमोर पहाटे बीएमडब्ल्यू कारने एका दुचाकीला जोरात धडक देऊन तसंच फरफटत नेल्याची माहिती समोर आली. या घटनेतील महिलेचा जागीच मृत्यू झाला. अशा अनेक घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत ज्यामध्ये अनेक निष्पाप लोकांनी आपले जीव गमावले आहेत
मुलीही असुरक्षित झाल्या
मे महिन्यात अकोल्यातील एका शाळेत 11 वर्षीय विद्यार्थिनीला शिक्षकानेच गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला.
बदलापूरमधील शाळेत चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची घटना मनाला चटका देणारी ठरली. यामुळे महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेवर राज्यातच नव्हे, तर देशभरात चर्चा झाली. ४ आणि ६ वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेनंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले.
या घटनांमुळे राज्यात महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (NCRB) अहवालानुसार, महाराष्ट्रात दररोज सरासरी 116 महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना नोंदवल्या जातात, ज्यामुळे महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर गंभीर विचार करण्याची आवश्यकता आहे.
पोलिस खात्याचा मनमानी कारभार
अनेक अशा घटना आहेत ज्या पोलिसांच्या निष्पक्ष कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित करणाऱ्या ठरल्या आहेत. यातून ‘कायद्याचे राज्य’ ही संकल्पना अनाथ झाल्याची दिसून आली. वेगवेगळ्या घटनेत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पोलिसांनी तक्रार दाखल करून घ्यायला विलंब लावल्याने अनेकांचे जीव गेले तर काहींवर अन्याय झाल्याचे पाहावयास मिळाले. अनेक लोक सध्या अन्याय सहन करतात, पण पोलीस स्टेशनची पायरी चढत नाहीत.
गेल्या वर्षभरात म्हणजे हत्या, अत्याचार, हिट अँड रन, लैंगिक अत्याचार अशा घटना वारंवार घडल्या आहेत. आणि याची जबाबदारी घेण्यात सरकार अपयशी ठरल्याचं दिसलं आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातही धार्मिक हिंसाचाराच्या वाढत्या घटना, महाराष्ट्रातील सुरक्षित वातावरण गढूळ झाले असल्याचे दिसत आहे. या घटना कधी नव्हे एवढ्या वाढत आहेत. यामुळे सर्वसामान्य माणसांना असा प्रश्न पडतो, महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनलाय का ?