महिला सक्षमीकरण
महिला बचत गटांची चळवळ गेल्या दशकभरापासून महाराष्ट्रात जोमाने सुरु आहे. गावोगावी नवीन बचत गट सुरु होत आहेत. त्याद्वारे आर्थिक स्वयंपुर्ततेच्या दिशेने होणारी महिलांची वाटचाल ही अत्यंत स्फुर्तीदायक बाब आहे. महिला बचत गटांच्या रुपाने महाराष्ट्रात एका नव्या इतिहासाची मुहुर्तमेढ रोवली गेली आहे. हा इतिहास आहे महिलांच्या स्वयंपूर्णतेचा. महिलांच्या एकजुटीचा आणि एकजुटीतून निर्माण होत असलेल्या महिलांच्या शक्तिचा, स्वयंसहाय्यता महिला बचतगट ही संकल्पना तारण व कारणाशिवाय स्वतःच्या आर्थिक गरजा स्वतःच भागविण्यासाठीची स्वयंभू यंत्रणा आहे. महिला बचतगट ही संकल्पना खरे तर सहकार चळवळीचे दुसरे नवे पर्व असून जनसामान्यांना सहकार चळवळीत सामावणारी संकल्पना आहे..
युवा विकास
कुटुंबाकडूनच समाजसेवेचा वारसा लाभलेल्या बुलढाण्याच्या लोकनेत्या जयश्री सुनील शेळके या स्वतः उच्चशिक्षित आहेत. इंग्रजी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेऊन त्यांनी वकिलीची पदवीही मिळवली आहे. त्यामुळे त्यांना युवक-युवतींचे शैक्षणिक प्रश्न, रोजगारातील अडथळे, शिक्षणात येणाऱ्या अडचणींची जाणीव आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच व्यावहारिक, व्यावसायिक आणि रोजगारपूरक शिक्षण मिळायला हवे, यावर त्यांचा भर असतो. जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना भेटी देऊन जयश्री सुनील शेळके तेथील शैक्षणिक परिस्थितीचा आढावा घेतात आणि सकारात्मक बदलांसाठी प्रयत्न करतात. दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनद्वारे त्यांनी बुलढाण्यात अनेक युवक-युवतींना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन दिले आहे. अनेक उच्च शिक्षण प्राप्त युवकांना व्यवसायासाठी प्रेरणा दिली. त्यांच्या व्यवसायाला सर्वतोपरी हातभार लावला आहे. शिक्षित युवक-युवतींच्या स्टार्टअप्ससाठी पुढाकार घेतला आहे. रोजगार वाढीसाठी त्या सतत प्रयत्नशील आहेत.
शिक्षण व बालविकास
बुलढाणा परिसरात जयश्रीताई शेळके यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य खरोखर प्रेरणादायी आहे. शिक्षण ही समाजाच्या प्रगतीची किल्ली आहे, हे ओळखून या क्षेत्रात नवा आदर्श घडविण्यासाठी त्या अविरत मेहनत घेत आहेत. शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी योगदान देत आहेत. शाळा-महाविद्यालयांना नियमित भेटी देऊन तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. विद्यार्थ्यांच्या मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक विकासाला चालना देणारे शिक्षण असायला हवे, शिक्षणात नवनवे प्रयोग आणि सुधारणा घडवून आणण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. बुलढाणा जिल्ह्यात विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण मिळावे, हाच त्यांचा आग्रह असतो. शिक्षित समंजस प्रगत समाज निर्मितीसाठी, नव्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्या कार्य करीत आहेत. अनेक गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षणासाठी मदत केली आहे. समाजातील हुशार होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण आणि करिअरच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. आजवर त्यांनी बुलढाण्यातील शाळा, महाविद्यालये, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न अत्यंत धडाडीने मांडले आहेत.
शेती व शेतकरी
बुलढाणा विकास प्रश्नांच्या विविध आंदोलनात जयश्री शेळके यांचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. शहरी विकास प्रश्न हाताळताना ग्रामीण भागातील शेती आणि शेतीविषयक समस्याही त्यांनी ऐरणीवर घेतल्या. पिकांच्या पेरणीपासून ते शेतीमाल बाजारात येईपर्यंत शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांच्या मागे नैसर्गिक संकटही असते. कधी अतिपावसामुळे पिकांचे नुकसान होते, तर कधी पावसाअभावी पिके वाळून जातात. अशा प्रत्येक संकटात जयश्री शेळके बळीराजाच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत. निकृष्ट बी-बियाणे, बनावट खते, खतांचा काळाबाजार यात जिथे जिथे शेतकऱ्यांची गळचेपी होते, अशा प्रत्येक ठिकाणी जयश्रीताई शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सर्वात पुढे असतात. शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचे कार्य त्यांनी केले आहे. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी त्या रात्री-अपरात्रीही शेतावर जातात. शेतकऱ्यांना आधार देणाऱ्या, गोरगरीब जनतेच्या मदतीला धावणाऱ्या, संकटसमयी धीर देणाऱ्या जयश्रीताई शेळके जनतेला हक्काची ताई वाटतात.