ॲड. जयश्रीताई शेळके यांनी दिशा महिला अर्बन पतसंस्थेची स्थापना केली आहे. या पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक होतकरू, व्यवसाय करू इच्छिणाऱ्या महिलांना भांडवल उपलब्ध करून दिले. तसेच महिलांना बचतीचे महत्व पटवून देऊन त्यांना अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणले. सर्वसामान्य महिलांना आर्थिक व्यवहाराचे ज्ञान मिळावे, बँकिंग व्यवहार करता यावेत, बचतीची सवय लागावी, आर्थिक साक्षरता, व्यावसायिक दृष्टिकोन वाढीस लागावा, महिलांना व्यवसाय उभारणीसाठी कर्ज उपलब्ध व्हावे अशा उद्देशाने या पतसंस्थेची उभारणी करण्यात आली आहे. सध्या या पतसंस्थेच्या १० शाखा आहेत. या माध्यमातून ७० कर्मचारी आणि १५ रिकरिंग एजंटना रोजगार मिळाला आहे. नोकरीची संधी मिळाल्यामुळे त्यांना कुटुंबाचे चांगल्या पद्धतीने संगोपन करण्यास मदत झाली आहे.