भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची गौरवशाली परंपरा

भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यापासून, ते राज्यकारभारात सुसूत्रता आणण्यापर्यंत, देशाला विकासाच्या वाटेवर गतिमान करण्यापर्यंत काँग्रेस पक्षाने दिलेले योगदान खूप महत्वाचे आहे. आज आपला भारत देश विकासाच्या वाटेवर गतिमान पद्धतीने पुढे जात असला, तरी या विकासाचे रेखाचित्र काँग्रेसच्या काळात तयार झाले आहे. हरितक्रांती, जलक्रांती, सिंचनक्रांती, उद्योग-व्यवसाय, आर्थिक स्वावलंबन, प्रबळ अर्थव्यवस्था या सर्वच क्षेत्रात त्या त्या वेळच्या काँग्रेस सरकारांनी वठवलेली निर्णायक भूमिका अत्यंत मोलाची आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात राजकीय पक्षांमध्ये भरमसाट वाढ झाली असली तरी भारत आणि काँग्रेस हे एक अतूट नाते आजही भारतीयांच्या मनात तितकेच पक्के आणि दृढ स्वरूपाचे आहे.

* इंडियन नॅशनल काँग्रेस (INC)
देशाच्या कारभारात अधिकाधिक भारतीयांना सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने इंडियन नॅशनल काँग्रेस ही भारतातील राजकीय प्रकारची पहिली राष्ट्रीय चळवळ होती. स्वातंत्र्यानंतर तो देशातील एक प्रमुख राजकीय पक्ष म्हणून उदयास आला. काँग्रेस पक्षाची स्थापना २८ डिसेंबर १८८५ रोजी एलेन ऑक्टव्हियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशॉ वाचा यांनी केली. मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेत संपूर्ण देशभरातील ७२ प्रतिनिधींनी एकत्र येऊन इंडियन नॅशनल काँग्रेस (INC) म्हणजेच राष्ट्रीय सभेची स्थापना केली. सुरुवातीला काँग्रेसचे नेतृत्व हे मवाळ गटाकडे होते. नंतर १९०६ ते १९१९ पर्यंत लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी काँग्रेसचे नेतृत्व केले. त्यानंतर १९२० ते १९४७ या काळामध्ये काँग्रेस पक्षाचे संपूर्ण नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले.

* पंचवार्षिक योजना पद्धती
काँग्रेसने सत्तेत असतांना आर्थिक मंदीसारख्या समस्यांचा सामना करत देशहितासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. भारताला स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे काँग्रेसचे निष्ठावान अनुयायी होते. त्या काळात रशियन राज्यक्रांतीने जी प्रगती घडवून आली होती, आपल्याही देशामध्ये अश्याच प्रकारची प्रगती व्हावी असे त्यांना वाटले. यासाठी त्यांनी पंचवार्षिक योजना पद्धतीचा स्वीकार केला. याचबरोबर कृषी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, संशोधन यांसारख्या घटकांना प्राधान्य दिले.

* तत्कालीन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची उद्दिष्टे
१) भारतात सुराज्य निर्माण करणे.
२) ब्रिटिश सरकार आणि भारतीय आंदोलकांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे.
३) भारतीय जनतेच्या मागण्या ब्रिटिश सरकारपर्यंत पोहोचवणे.
४) संविधानिक सुधारणांची मागणी करणे
५) जनतेच्या मनात राष्ट्रवादी विचार निर्माण करणे.

* भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष स्थापनेची गरज
काँग्रेसच्या स्थापनेपूर्वी अनेक संघटना स्थापन करण्यात आल्या होत्या. जसे की, ब्रिटिश इंडियन असोसिएशन, इंडियन (नॅशनल) असोसिएशन, मद्रास महाजन सभा, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. जनतेच्या मागण्या ब्रिटिशांपर्यंत पोहचविणे हे या संघटनांचे उद्दिष्ट होते. या सर्व संघटना प्रादेशिक स्तरावर काम करत होत्या. आपआपल्या राज्यात ब्रिटिशांविरोधात आवाज उठविण्याचे काम या संघटनांमार्फत होत असे. त्यामुळे या संघटनांचा अपेक्षित प्रभाव पडत नव्हता. त्यामुळे अखिल भारतीय स्तरावर एक संघटना स्थापन करण्याची गरज निर्माण झाली आणि यातूनच काँग्रेसची स्थापना झाली.

* पहिल्या अधिवेशनात संघटना सूत्र
काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई येथील गोवालिया टॅंकजवळील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत भरले होते. यावेळी फिरोजशाह मेहता, दादाभाई नौरोजी, दिनशॉ वाचा, न्या. रानडे, बद्रुद्दीन तय्यबजी, रा. गो. भांडारकर, के. टी. तेलंग, पी. आनंद चार्ल्स, एस्. सुब्रमण्यम् अय्यर, दिवाण बहादूर रघुनाथराव, केशव पिल्ले, एन. जी. चंदावरकर, गोपाळ गणेश आगरकर इत्यादी मंडळी उपस्थित होती. काँग्रेस पक्षाच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद व्योमकेशचंद्र बॅनर्जी यांनी भूषविले होते. या अधिवेशनामध्ये काँग्रेसचे संघटनासूत्र ठरवण्यात आले होते.

* काँग्रेस अध्यक्षपदाचा प्रवास
महात्मा गांधी यांच्या दुर्दैवी हत्येनंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काँग्रेसचे नेतृत्व केले. साहित्यिक पुरुषोत्तमदास टंडन हे १९५० मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष होते, तर १९५१ ते १९५४ या काळात नेहरू यांनी अध्यक्षपद भूषविले. पुढे १९५९ मध्ये इंदिरा गांधी या काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या. त्यानंतर नीलम संजीव रेड्डी, के. कामराज, निजलिंगप्पा, बाबू जगजीवन राम, शंकरदयाळ शर्मा, देवकांत बरुआ आणि के. बी. रेड्डी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले. १९८५ मध्ये माजी पंतप्रधान आणि दूरदर्शी नेतृत्वाचे धनी राजीव गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यांच्या हत्येनंतर काँग्रेसपुढे अध्यक्ष निवडण्यासाठी मोठा प्रश्न होता. त्यावेळी माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव आणि त्यांच्यानंतर सीताराम केसरी यांनी काँग्रेसचे नेतृत्व केले. पुढे सोनिया गांधी यांनी सक्रिय राजकारणात सहभाग घेतला आणि १९९८ ते २०१७ पर्यंत जवळपास २० वर्षे त्या काँग्रेसच्या अध्यक्षा राहिल्या. २०१७ मध्ये राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेस पक्षाची धुरा सोपविण्यात आली. मात्र काही काळानंतर राहुल गांधींनी अध्यक्षपद सोडले आणि आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत. स्वातंत्र्यलढ्यापासून आधुनिक भारताच्या निर्मितीपर्यंतच्या प्रवासात काँग्रेस पक्ष, काँग्रेस नेते आणि पदाधिकाऱ्यांनी देशाच्या जडणघडणीत दिलेले योगदान खूपच महत्वपूर्ण आहे.

Leave A Comment